Loksatta Editorials : विशेष संपादकीय : जसे नसतो तसा!

0
21

बॉलीवूडमधील हिरेजडित अशा कपूर घराण्यामध्ये जन्माला येणे हे ऋषी कपूरचे भाग्यच.

कपूर घराण्यामध्ये जन्माला येणे हे ऋषी कपूरचे भाग्यच. पण असे भाग्य शाश्वत आणि दीर्घ यशाची हमी देऊ शकत नाही..

इरफान खान याच्यापाठोपाठ ऋषी कपूरचेही निधन व्हावे हा दुर्दैवी योगायोग. इरफान खान खऱ्या आयुष्यात जसा होता तसाच पडद्यावरही होता. तर ऋषी कपूर आपल्यातील बहुतांश जसे खऱ्या आयुष्यात अभावानेच असतात.. खरे तर नसतातच.. असा कलाकार होता. सर्व काही वडिलोपार्जित मिळालेला, कशाची ददात नसलेला, कपूर कुलोत्पन्न असल्याने ‘ऐशा ललना स्वये येऊनी अलंगिति ज्यांना’ असा ‘तेचि पुरुष दैवाचे’ म्हणवून घेणारा. इरफान वास्तवाच्या दाहाने काळवंडलेला तर ऋषी कपूर स्वप्नाच्या मोहाने मोहरलेला. कला ही आयुष्याचा भाग असते आणि आयुष्य हे कलेस कवेत घेऊन जगणे नावाच्या उत्सवाचे दर्शन घडवत असते. म्हणूनच इरफानपेक्षा कलावंत म्हणून पिंडाने संपूर्ण भिन्न असलेल्या ऋषी कपूर याच्या निधनानेही आपण काय गमावले हे शोधणे आवश्यक असते. या दोघांतील भिन्नता जितकी तीव्र तितके रसिकप्रेमातले साम्यही लोभस.

बॉलीवूडमधील हिरेजडित अशा कपूर घराण्यामध्ये जन्माला येणे हे ऋषी कपूरचे भाग्यच. पण असे भाग्य शाश्वत आणि दीर्घ यशाची हमी देऊ शकत नाही, हे रणधीर, राजीव, करण, कुणाल अशा कपूर कुलोत्पन्न इतरांच्या बाबतीत दिसून आले आहे. ऋषीचे वडील राज कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’मध्ये एका छोटय़ा भूमिकेसाठी किंवा ‘बॉबी’मधील मुख्य भूमिकेसाठी ऋषी कपूरचा विचार केला, त्यामागे केवळ आर्थिक कारण होते. डब्यात गेलेल्या ‘मेरा नाम जोकर’ने कफल्लक केल्यानंतर स्वस्तात मस्त मनोरंजन करणाऱ्या आणि मुख्य म्हणजे पैसे मिळवून देईल अशा एखाद्या सिनेमाची राज कपूर यांना गरज होती. म्हणून दोन अनोळखी कलाकारांना घेऊन ‘बॉबी’. अनाघ्रात सौंदर्य हेरून योग्य त्या कोंदणात सादर करण्याचे राज कपुरी कौशल्य डिंपलच्या रूपाने त्या वेळी पुन्हा दिसले. पुढे डिंपल ‘बॉबी’पेक्षा अधिकाधिक सुंदर होत गेली (संदर्भासाठी: ‘बॉबी’ १९७३ आणि याच दोघांचा ‘सागर’ १९८५.) आणि ऋषी कपूर अधिकाधिक तरुण आणि स्वप्ननगरचा राजकुमार. ‘बॉबी’नंतर प्रत्येक चित्रपटात – दिग्दर्शक, संहिता, सहकलाकार दर्जेदार असो वा नसो – ऋषी कपूरने स्वत:ची छाप पाडली. त्याचा पडद्यावरील वावर अत्यंत आत्मविश्वासपूर्ण होता तरीही त्यात दंभ आणि दर्प नव्हता. अभिनय जमेल तितका सच्चा होता, पण हास्य निरलस होते. ७० आणि ८०च्या दशकांमध्ये व्यवस्थेविरुद्ध चिडलेल्या तरुणांचा फूत्कारी वावर रुपेरी पडद्यावर अधिक आपलासा वाटायचा, पण तरीही रोमँटिक चेहरा-मोहरा असलेला ऋषी कधी विजोड वाटला नाही.

त्याचा हसरा, तजेलदार चेहरा ही त्याची सर्वात मोठी संपत्ती. कोणत्याही विशेष कष्टाविना आशय मांडता येणे त्याला सहज जमायचे. त्याची भूमिका असलेले चित्रपट फार महान आशयघन किंवा विषयसंपन्न होते अशातलाही भाग नाही. समांतर चित्रपटांच्या चळवळीला तो समांतरच राहिला! चित्रपट हे औटघटका मनोरंजन करण्याचे साधन आहे, यावर विश्वास असलेल्या अगणित सिनेप्रेमींचा तो लाडका होता. त्याचे वडील राज कपूर, काका शशी कपूर यांच्याप्रमाणे चित्रपट किंवा रंगभूमी यांच्यासाठीचे ध्येयवेड त्याच्या ठायी नव्हते. महानतेपेक्षा कमी पण सर्वसामान्यांपेक्षा किती तरी वर असा आपला दर्जा त्याने शेवटपर्यंत राखला.

खरे तर त्याच्या आगमनानंतरच्या काळात देशात अनेक राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे आली. बांगलादेशचे युद्ध, आणीबाणी, नवसंवेदनांचा जन्म, नव्या सामाजिक माध्यमांचा जन्म आणि त्यांचा विस्फोट, चित्रपटांसाठी येऊ घातलेले नवनवे मंच, समाजातील अनेक स्तरांवरील उद्विग्नता आणि हरवलेपणाची भावना.. अशा प्रलयंकारी अवस्थेतही ऋषी आणि त्याचे चित्रपट आनंदमार्गी राहिले. त्याच्या आधी राजेश खन्नासारख्या नटाच्या आगमनाने या देव आनंद परंपरेत नव्याने भर पडलेलीच होती. स्व-मग्न राजेश खन्ना आणि स्व-भग्न अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांच्यातील मधल्या जागेत ऋषी कपूर याने आपल्यासाठी चोख जागा तयार करून घेतली आणि ती शेवटपर्यंत राखली. अभिनेता म्हणूनही तो वयाप्रमाणे पिकत गेला. क्रिकेटप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो निवृत्तीचा! आपण संपलो आहोत, चलनातून बाद झालो आहोत हे मान्यच करण्याची बौद्धिक कुवत नसल्यामुळे प्रवाहाने बाहेर फेकण्याच्या वेळेपर्यंत अनेक जण हात-पाय मारतच असतात. नव्वदच्या दशकात शाहरुख-आमिरसारख्या वेगळ्या नव्या दमाच्या रोमँटिक हिरोंचे युग अवतरल्याची जाणीव ऋषी कपूरला झाली आणि त्याने ती मोकळेपणाने स्वीकारली. त्यातही पुन्हा ‘सिनेसृष्टीने इतके मला दिले, तेव्हा मी आता दिग्दर्शनात उतरणार’ वगैरे पळवाटा नाहीत. तसे केविलवाणे धक्के मध्यंतरीच्या काळात अमिताभ बच्चननेही खाल्ले. राजेश खन्ना किंवा देव आनंद यांना पूर्णविराम कोठे घ्यायचा हे अखेपर्यंत समजलेच नाही. राज कपूर यांना माध्यमांची अविरत जाण होती आणि दिलीप कुमार यांनी योग्य वेळी पोक्त भूमिका करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोघांचाही आब कायम राहिला. ऋषी कपूरच्या बाबतीत असा पेच कधी निर्माणच झाला नाही. कारण आपल्या मर्यादांकडे तो कधीही डोळेझाक करीत नसे. त्यामुळे काळाचे वारे ओळखत त्यानुसार आपल्या शिडाची दिशा बदलण्याचे चातुर्य त्याने सहज दाखवले.

आपण महान कलाकार आहोत असा तोरा ऋषी कपूरने कधीही मिरवला नाही. सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मी महाविद्यालयात नापास झालो आणि पुढच्या शिक्षणात रस गमावल्याने वडिलांच्या कृपेने चित्रपटात आलो हे तो शुद्ध प्रामाणिकपणे सांगत असे. हे एका अर्थी कपूर कुटुंबाचेच वेगळेपण ठरते. ते चांगल्या अर्थी खुशालचेंडू असतात आणि ते लपवण्याचा जराही प्रयत्न करत नाहीत. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे समग्र चित्रपटसृष्टी सत्ताधाऱ्यांची तळी उचलण्यात धन्यता मानत असताना हे कपूर कुटुंबीय मात्र आपण बरे आणि आपले मायावी जग बरे, असेच असतात. निदान हे मायावी आहे हे सांगितले जाते. राजकारणाचे तसे नाही. त्यामुळे एकही कपूर राजकारणाच्या वाटय़ास गेल्याचे दिसत नाही. पण एका बाबतीत ऋषी इतर कपुरांपेक्षा वेगळा ठरतो.

ते म्हणजे प्रचलित मुद्दय़ांवर ट्विटरच्या माध्यमातून का असेना तो काहीबाही भूमिका घेत असे. अगदी अलीकडेच त्याने मद्याची दुकाने काही वेळ तरी खुली ठेवण्याची मागणी केली होती. उगाच ‘मी नाही बा त्यातला आणि दरवाजा लावा आतला’ असा प्रकार नाही. स्वत:चे मत तो मोकळेपणाने मांडायचा आणि प्रसंगी जल्पकांना शिंगावरही घ्यायचा. त्याची मते फार अभ्यासू नव्हती. पण तसा त्याने कधी दावाही केला नाही. कर्करोगाशी त्याची लढाई वर्षभर निर्धाराने सुरू होती. त्याही काळात त्याचे हास्य किंवा व्यक्त होण्याची निकड लोपली नव्हती. हे सच्चेपण, निखळ आनंद आस्वादण्याची प्रवृत्ती लोप पावत चालली आहे, ही जाणीव ऋषी कपूरच्या जाण्याने व्यक्त झालेल्या सार्वत्रिक हळहळीतून पुरेशी स्पष्ट होते. याच्याबरोबर आपले तरुणपण गेले अशी जाणीव अनेकांना झाली हे ऋषी कपूरचे मोठेपण. असे भाग्य वाटय़ास आलेला देव आनंदनंतर तोच बहुधा.

इतके स्वप्नवत जगणे भोगल्यानंतर एक प्रकारची तृप्त प्रसन्नता व्यक्तिमत्त्वात येते. ऋषी कपूरच्या शरीरातून ती झिरपत असे. अशा आयुष्याचे भाग्य फारांच्या नशिबात नसते आणि सामान्यांस आयुष्यात जे नसते ते खुणावत असते. असे बरेच काही ऋषी कपूर याच्या आयुष्यात होते. म्हणून जे आणि जसे आपण नसतो तसा ऋषी कपूर होता. त्याच्या निधनाने एक प्रसन्नप्रसादी आयुष्य संपले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here